नवी दिल्ली-मोदी आडनाव प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आल्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहेत. गुजरात उच्च न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले होते की, या प्रकरणाव्यतिरिक्त राहुल यांच्याविरुद्ध किमान 10 खटले प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सुरत न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. गुजरात हायकोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात राहुल यांच्या याचिकेवरील सुनावणीची तारीख अद्याप समोर आलेली नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यास राहुल यांचे सदस्यत्व बहाल केले जाईल आणि ते 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकतील. तसे झाले नाही तर त्यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.
दुसरीकडे, राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. मोदी आडनाव प्रकरणात राहुल यांची बाजू तसेच त्यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली.