मुंबईः “कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS President Raj Thackeray ) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन जारी करून दिलाय. राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे.
तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.” राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती याचा आदर केलाच पाहिजे, या ठाम मताचा मी आहे.
सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथले सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.