पंढरपूर-मंत्री छगन भुजबळ हे कारागृहात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे, असा दावा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच कारागृहातून जामीनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.
कारागृहात असताना भुजबळ रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचारांची गरज लागत होती. आता ते एकदम तंदुरुस्त आहेत, असा दावा करुन कदम म्हणाले की, त्यांच्या छातीत दुखतेय, पाय सुजलाय, खांद्याचा त्रास होतो हे आता आम्ही ऐकले नाही. कोणाच्याही नशिबात कारागृह येऊ नये. ते नरक आहे. तेथे गेल्यावर लोक आठ दिवसांत आजारी पडतात. छातीत दुखते आणि बरेच काही होते अशी कारणे सांगून नेते, लोक आणि पक्षाची सहानभुती घेत जामीन मिळवतात. छगन भुजबळांनीही हेच केले, असे कदम म्हणाले. जामीनासाठी उशीर होत असल्याबद्दल ते नाराज असायचे. पवारांनी मदत केली पाहिजे व जामीन झाला नाही तर वेगळा मार्ग स्विकारावा लागेल, अशा पद्धतीनं भुजबळांनी शरद पवारांना ब्लॅकमेलिंग केल्याचे आम्ही पाहिले असल्याचे कदम म्हणाले.















