नागपूरः विधान परिषदेचा नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ काँग्रेस शिवसेनेसाठी (Nagpur Division Teachers Constituency) सोडणार काय, हा कळीचा मुद्दा बनला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी काँग्रेसने अद्याप त्यावर अंमित भूमिका घेतलेली नाही. मात्र, या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षात नागपुरात असंतोष निर्माण झाला असून काँग्रेस नेतृत्व अतिशय सावध भूमिका घेऊन आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई, शिक्षक भारती आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने एकत्र बसून १६ जानेवारीपूर्वी निर्णय घ्यावा, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेचा उमेदवार ऑक्सिजनवरच असल्याचे बोलले जात आहे.नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने नागो गाणार यांना तिसऱ्यांना मैदानात उतरविले आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट प्रणित शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाकरे गटाने आठवडाभरापूर्वीच या जागेवार दावा ठोकून उमेदवार जाहीर करून टाकल्याने महाविकास आघाडीची पंचाईत झाली आहे. काल झालेल्या आघाडीच्या बैठकीत ही जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप काँग्रेसने अधिकृतरित्या या जागेवरील दावा सोडलेला नाही. माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी आणि डॉ. बबनराव तायवाडे या नेत्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाले तर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून सुधाकर अडबाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून या दोन्ही संघटनांनी काँग्रेसला समर्थन मागितले आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे पेच निर्माण झाला आहे. या दोघांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यास त्याचा लाभ भाजपचे नागो गाणार यांनाच मिळणार आहे.
नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेसपुढे धर्मसंकट, कोणाला द्यावा पाठिंबा?
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा