नांदुरा ते मोताळा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

0

 

बुलढाणा: नांदुरा ते मोताळा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज खामगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.नांदुरा- मोताळा रस्त्याचे काम हे दीड ते दोन वर्षांपासून सुरू असून नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते खुदावंतपुर पर्यंतचा रस्ता हा गेली कित्येक महिन्यांपासून थंड बस्त्यात पडला आहे. या रस्त्यावरील भीमनगर जवळील असलेला रस्ता कित्येक महिने नुसता खोदून ठेवला होता यामुळे नागरिकांची फार फरफट होत होती. आता तो रस्ता सुरू केला पण तो ही अपूर्ण, त्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर आले आहे. तसेच अपूर्ण काम केल्यामुळे सर्वत्र धुळीचे लोट उडत आहेत. हा रस्ता पूर्ण जोडणी न करता तसाच ठेवल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे तसेच अखंड जोडणी नसल्याने गचके बसून नागरिकांच्या डोळ्यात धूळ व मणक्याला इजा होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याचे गांभीर्य ओळखून सदर रस्ता पूर्ण करावा अशी मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने करण्यात आली आहे.