सिद्धरामय्या की डीके शिवकुमार? मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु

0

बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असताना पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह डिके शिवकुमार यांच्याप्रमाणेच ज्येष्ठ नेते परमेश्वर आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. मात्र, सध्या डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन गोटात जोरदार रस्सीखेर सुरु झाली आहे. सिद्धरामय्या हेच खरे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा दावा त्यांच्या मुलाकडून करण्यात आलाय तर शिवकुमार गटाने देखील कंबर कसली आहे.
सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पद भूषवलं आहे. आज निवडणूक निकालानंतर काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला तर सिद्धरामय्या हे काँग्रेसची पहिली पसंती असू शकतात, असे काँग्रेसमधील अनेकांना वाटते. तर दुसरीकडे शिवकुमार यांचेही मुख्यमंत्री होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आहे.
काँग्रेस नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांना आजच दिल्लीला बोलावले आहे. उद्या कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली असून कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण, याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसच्या विजयानंतर ढसाढसा रडणाऱ्या शिवकुमार यांनी सांगितले की, “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू. भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकले, तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणे पसंत केले. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे, असे शिवकुमार म्हणाले आहेत.