नारायण राणेंचा खळबळजनक दावा : म्हणाले, माझा इतिहास शिवसेना घडविण्याचा
मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut ) आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane ) यांच्यात सुरू असलेला राजकीय वाद आता आणखीनच चिघळला आहे. संजय राऊत यांनी काल एकेरी उल्लेख करत आव्हान दिल्यानंतर आज नारायण राणे यांनीही जोरदार प्रत्त्युत्तर देत एक खळबळजनक दावा केला आहे. ‘मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत हे माझ्याकडे आले आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल जे काही बोलले, ते मी उद्धव यांना एकदा भेटून सांगणार आहे. मी ते सांगितल्यानंतर उद्धव आणि रश्मी हे दोघेही राऊतांना चप्पलेने मारतील,’ असा घणाघात नारायण राणेंनी केला आहे.
सुरक्षेविना फिरून दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी नारायण राणेंना दिले होते. हे आव्हानही राणे यांनी स्वीकारले आहे. ‘संजय राऊत यांनी मला सुरक्षेविना फिरण्याचे आव्हान दिले आहे. कुठे यायचे हे राऊतांनी सांगावे, मी आजच तिथे यायला तयार आहे,’ असे ते म्हणाले. ‘माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे, शिवसेना संपवण्यामध्ये नाही. संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, आज त्यांना शिवसेना संपवण्याचाच आनंद होत आहे. शिवसेनेचे राज्यात ५६ आमदार होते. आता फक्त १२ उरले आहेत आणि ते उरलेले घालवण्यासाठी राऊत तयार आहेत,’ अशा शब्दांत राणेंनी समाचार घेतला आहे.
‘आम्ही विकासाचे राजकारण करत आहोत. राज्याचा विकास व्हावा, रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी मी आणि माझा पक्ष प्रयत्न करत आहे. मात्र संजय राऊत यांचे एक तरी विधायक काम दाखवा,’ असा हल्लाबोलही नारायण राणे यांनी यावेळी केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टिल्ल्या संबोधल्यानंतर सुरू झालेले टीकस्त्र डागण्याचे सत्र राणे आणि राऊतांमध्ये सुरू असलेले शाब्दिक युद्धापर्यंत येऊन पोहोचले आहे. सध्या दोन्ही नेत्यांमधील वाक् युद्ध टिपेला पोहोचले आहे. नजिकच्या काळात तरी हे युद्ध थांबताना दिसत नाही.