मुंबई : काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला बॉलिवूडचा चित्रपट ‘स्पेशल 26’ च्या कथनकाला साजेशी घटना नवी मुंबई परिसरात उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून सहा जणांच्या एका टोळीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माजी अधिकाऱ्याकडून ३६ लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना एरोली येथे घडली. या दरोड्यात सहा जणांच्या टोळीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी कांतीलाल यादव यांच्या घराची झडती घेतली व हा मौल्यवान ऐवज पळविला.
या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ जुलै रोजी सहा जणांची टोळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक असल्याचे भासवत या माजी अधिकाऱ्याच्या घरात शिरली. तुमच्याविरुद्ध तक्रार असल्याचा दावा करीत त्यांनी सराईतपणे घराची झडती सुरु केली. झडती घेण्यापूर्वी त्यांनी यादव आणि त्यांच्या पत्नीचे मोबाईल जप्त करुन स्वतःजवळ ठेवले तसेच पूर्ण होईपर्यंत यादव कुटुंबियांना एका बाजूला बसून राहण्यास सांगितले होते. त्यांना ओळखपत्र मागण्यात आल्यावर ते झडतीनंतर दाखविले जाईल, असे ते सांगत नकार दिला. त्यांच्यातील पाच जणांनी फ्लॅटमधील तीन अलमाऱ्या फोडून आतील सुमारे २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ४० हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठी, ८० हजार रुपये किमतीचे हिरेजडीत मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीची घड्याळे असा ऐवज एका पिशवीत भरून तेथून पळ काढला.