
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीचा उद्या शेवटचा दिवस असून बुधवारी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद (Hearing on Maharashtra Political Crisis) करण्यात आले. शिवसेनेच्या 39 आमदारांसोबत आता मविआच्या 16 आमदारांचाही ठाकरे सरकारवर विश्वास नव्हता, असा युक्तीवाद आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी केला. नवीन सरकार स्थापन करण्यामागे केवळ शिवसेना विधीमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षही सामील होता. मविआ सरकारमधून जरी 39 आमदार बाहेर पडले नसते किंवा ते अपात्र ठरले असते तरी ते सरकार कोसळले असते, असे ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या वेळी घेण्यात आलेल्या मतदानात महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. नेमक्या याच गोष्टीचा संदर्भ घेत नीरज किशन कौल यांनी आज युक्तीवाद केला. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर पडले नसते किंवा ते अपात्र जरी ठरले असते तरीही ते सरकार पडले असते. कारण अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीचे 16 आमदार गैरहजर होते. या लोकांचे मत ठाकरे सरकारला नव्हते. कारण त्यांचाही सरकारवर विश्वास नव्हता, सरकारने त्यांचा विश्वास गमावला होता, असा दावाही कौल यांनी केला.
दरम्यान, दहाव्या सुचीनुसार विचार केला तरी दोन गट तर आहेतच. फुट पडल्यावर दरवेळी पक्ष सोडलाच जातो असे नाही, असे मत सरन्यायाधीशांनी यावेळी व्यक्त केले. दोन्ही गट पक्षातच असले तरी दहावी सूची लागू होईलच. कोणत्या गटाकडे बहुमत आहे याने दहाव्या सूचीच्या तरतुदींवर परिणाम होत नाही, असेही ते म्हणाले. उद्या या सुनावणीचा शेवटचा दिवस असून तुषार मेहता राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर नीरज किशन कौल 45 मिनीटे युक्तीवाद करतील. त्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी युक्तीवाद करणार आहेत.