काळ आला होता पण वेळ आली नव्हती

0

वाघाने दोनदा घातली झडप : केवळ सुदैवानेच वाचविले युवकाला

गडचिरोली. केवळ वाघाची डरकाळी कानावर पडली तरी ह्रदयात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. त्यात वाघ खरेच पुढ्यात उभा झालाच तर याचा विचारही करवित नाही. पण, शेतकामात व्यस्त असलेल्या एका युवकासमोर भुकेला वाघ खरोखरच उभा झाला. त्याने युवकावर झडपही घातली (tiger pounced on the youth). मात्र, युवकाने समयसूचकता, चातुर्य, धाडस दाखवित स्वतःचा बचाव करवून घेतला. पहिला वार चुकल्याने चवताळलेल्या वाघाने पुन्हा त्याच युवकाच्या दिशेने झेप घेतली. नेमके त्याचवेळी आसपासच्या लोकांनी आरडाओरड केली आणि वाघाला तोंडाजवळ आलेली शिकार सोडून पळून जावे लागले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीची आठवण करून देणारी ही घटना आरमोरी तालुक्यातील विहीरगाव (कुकडी) (Vihirgaon (Kukdi) in Armori Taluk) येथील शेतशिवारात शनिवारी घडली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून युवकाचा बचावला. विकास भोयर असे त्या नशीबवान युवकाचे नाव.

विहीरगाव (कुकडी) येथील रहिवासी योगाजी भोयर यांनी सिर्सी साझ्यातील नरोटीचक परिसरातील शेतात उन्हाळी धानपीक व भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यामुळे भोयर कुटुंब शनिवारी सकाळच्या सुमारास धानपिकावर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी कोरेगाव मार्गावरील आपल्या शेतात गेले होते. दरम्यान, योगाजी भोयर यांचा मुलगा विकास पाठीमागे फवारणी पंप लावून शेतात फवारणी करीत होता. कामात व्यस्त असताना गवताच्या आड दबा धरून बसलेल्या वाघाने विकासच्या दिशेने धाव घेतली. वाघ आपल्या दिशेने धावत येत असल्याचे पिंटूच्या लक्षात येताच त्याने त्या बांधीतून पळ काढला. वाघाने विकासवर झडप घातली. मात्र, पाठीवरील फवारणी पंपाने ढाली प्रमाणे त्याचे रक्षण केले. वाघाचा पंजा फवारणी पंपाच्या टँकला लागला. या हल्ल्यात तो कसाबस बचावला. पण, पहिला घात चुकल्याने वाघ अगदी चवताळला. त्याने दुसऱ्यांदा विकासवर झडप घेतली. मात्र, जवळच असलेल्या आई वडिलांनी व आसपासच्या लोकांनी आरडाओरड करीत वाघाच्या दिशेने धाव घेतली. अचानक झालेल्या या गलक्यामुळे वाघ गोंधळला आणि तिथून पळून गेला. परिसरात वाघाचे वास्तव्य लक्षात आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.