
विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पुरस्कार जाहीर
नागपूर (Nagpur):- विश्व संवाद केंद्राच्या वतीने देवर्षी नारद जयंतीनिमित्त यंदा आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार’ सोहळ्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.
विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस यांनी ही घोषणा येथे एका पत्रकार परिषदेत केली. विनोद देशमुख, मंजुषा जोशी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या १३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील ‘वार्ता सभागृह’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
विविध माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार आणि माध्यम संस्थांचा यावेळी सन्मान होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री ॲड्व्होकेट उज्ज्वल निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. देवर्षी नारद जयंतीनिमित्त दरवर्षी, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्याची परंपरा विश्व संवाद केंद्राने जपली आहे. वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, रेडिओ, डिजिटल मीडिया, छायाचित्रण, नागरिक पत्रकारिता तसेच साप्ताहिक प्रकाशन अशा विविध क्षेत्रांतील माध्यमकर्मींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. यंदा प्रिंट मीडिया मधून महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार निखिल भुते, इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून युसीएनचे देवेश द्विवेदी, छायाचित्रकार म्हणून लोकमतचे संजय लछुरिया, नागरी पत्रकार म्हणून निकिता गावंडे, डिजिटल मीडियामधून शंखनाद न्यूज चॅनलचे संपादक सुनील कुहीकर, साप्ताहिक पत्रिका जीवन विकासच (रामकृष्ण मठ), आकाशवाणीच्या हेमांगी कुलकर्णी तसेच पत्रकारिता क्षेत्रात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी वेद घुलघुले आणि वैष्णवी ठाकरे यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि जनजागृतीपर विषयांवर सातत्याने कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. विश्व संवाद केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात पत्रकार, संपादक, लेखक, स्तंभलेखक, विचारवंत, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नागपूरच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा मानला जात असून, माध्यम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला आहे.
शंखनाद न्यूज चॅनल नागपूर
* सुमारे पाच वर्षांपूर्वी या चॅनलची सुरुवात झाली
* सुरुवातीला फक्त मराठी भाषेतून कंटेंट प्रसारित करणाऱ्या या चॅनलने आता मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेकडेही मोर्चा वळविला असून, बातम्या-वृत्त विश्लेषण व मुलाखती हिंदी व इंग्रजी भाषेमधून प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे
* जी टी पी एल च्या नेटवर्क वरून प्रसारित होणारी ही स्थानिक वृत्तवाहिनी असून, बातम्यांच्या पलीकडे मुलाखती, वृत्त विश्लेषण, खाद्ययात्रा, सल्ला डॉक्टरांचा, भक्तीगंगा, मैफल अशा विविध कार्यक्रमांचे प्रसारणही या चॅनलवरून होत असते
* बातमीदारी करताना विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत आवाज उठविणे यासाठीही शंखनाद न्यूज चॅनल कार्यरत आहे
* समाजात चांगले व सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा समाजाला परिचय करून देण्यासाठीचा शंखनाद न्यूज चॅनल चा पुढाकार आजच्या पत्रकारितेच्या जगतात महत्त्वाचा ठरला आहे
* विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती या चॅनलवरून आजवर प्रसारित झाल्या आहेत
* आजची काळाची गरज लक्षात घेता टीव्ही चॅनल व्यतिरिक्त youtube चॅनल, पोर्टल, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस वरही शंखनाद न्यूज चॅनल ची उपस्थिती लक्षणीय ठरते आहे
* टीव्ही चॅनल म्हणून शंखनादचा प्रेक्षक वर्ग विदर्भा पुरता मर्यादित असला तरी त्याच्या यूट्यूब चॅनल व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मात्र विदर्भाच्या सीमेबाहेर केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश विदेशातूनही प्रतिसाद मिळू लागला आहे
* संचालक – हरजितसिंग उर्फ लकी सलुजा
संचालिका – राखी कुहीकर
व संपादक/संचालक सुनील कुहीकर यांच्या नेतृत्वात ही वृत्तवाहिनी लक्षणीय प्रगती करीत आहे



















