२८ फेब्रुवारीपासून तीन दिवस राष्‍ट्रीय, आंतराष्‍ट्रीय चित्रपटांची पर्वणी

0

Nagpur Edition – 23rd Pune International Film Festival :”नागपूर एडिशन – २३वा पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल

१२ राष्ट्रीय पुरस्कार विजेते जाहनू बरुआ यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र शासन ,महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य विभाग , पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने बहुचर्चित “नागपूर एडिशन – २३वा पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हल” (Nagpur Edition – 23rd Pune International Film Festival”) येत्या २८ फेब्रुवारी, १ व २ मार्च रोजी नागपुरात आयोजन करण्‍यात आले आहे.

प्रख्यात दिग्दर्शक व ‘पिफ’ चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या मार्गदर्शनात आयोजित हा फिल्म फेस्टिव्हल नागपूरमधील मेडिकल चौक येथील व्हीआर मॉल, सिनेपोलिसमध्ये होत आहे.

फिल्‍म फेस्‍टीवलचे उद्घाटन शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता बारा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, पद्म भूषण जाहनू बरुआ यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. जब्बार पटेल यांच्यासह ‘पिफ’ चे क्रिएटिव्ह हेड व फिल्मगुरु समर नखाते, डेप्युटी डायरेक्टर अदिती अक्कलकोटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील. उद्घाटनानंतर पोलंड येथील डॅमियन कोकर दिग्दर्शित “अंडर द वॉल्कनो” हा १२० मिनिटांचा सिनेमा दाखवण्यात येणार आहे.
मास्टरक्लास व पॅनेल डिस्‍कशन
शनिवार, १ मार्च दुपारी १२:४५ वाजता आसामी व हिंदी चित्रपट दिग्दर्शक जाहनू बरुआ यांचा ‘मास्‍टरक्‍लास’ आयोजित करण्‍यात आला आहे. जाहनू बरुआ यांच्‍या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात ‘अपरूपा‘ या सिनेमाने झाली होती. या सिनेमाने राष्ट्रीय स्तरावर त्‍यांना ओळख मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या सिनेमांना ‘सिल्वर लेपर्ड’ (लोकार्नो आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल) सारखे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. फिल्‍म क्षेत्रात करीअर करू इच्छिणारे आणि प्रेक्षकांसाठी हा ‘मास्‍टरक्‍लास’ अनुभवसंपन्‍न करणारा ठरणार आहे.

रविवार, ०२ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता “मराठी सिनेमाची वाटचाल” या विषयावर पॅनेल डिस्‍कशन आयोजित करण्‍यात आले असून यात अभिनेते जितेंद्र जोशी, निखिल महाजन, किरण यज्ञोपवीत व डॉअभिजीत देशपांडे यांचा सहभाग राहील.

२ स्‍क्रीनवर १५ सिनेमे
फिल्म फेस्टिव्हल मध्‍ये ११ आंतरराष्ट्रीय फिल्‍मसह ४ राष्ट्रीय ज्यापैकी २ सिनेमे मराठी असणार आहेत, अशा एकुण १५ दर्जेदार चित्रपटांचे स्‍क्रीनिंग केले जाणार आहे. व्‍हीआर मॉलमधील स्क्रीन ६ व स्क्रीन ४ वर या सर्व सिनेमांचे स्‍क्रीनिंग सकाळी १० ते सायंकाळी ८ दरम्‍यान केले जाणार आहे. गोदार्द या महान दिग्दर्शकावरची अत्त्युत्तम डॉक्युमेंट्री या फेस्टिव्‍हलचे विशेष आकर्षण राहणार आहे.

जगभरातील नितांत सुंदर चित्रपट बघण्याची संधी या निमित्‍ताने नागपूरकरांना मिळणार असून सिनेमा या माध्यमाची ताकद आणि जादू काय असते ते समजून घेण्याची ही पर्वणी नागपूरकरांना मिळणार आहे, असे अजेय गंपावार, चीफ को-ऑर्डिनेटर, नागपुर एडिशन ऑफ़ पुणे इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल, नागपुर यांनी म्‍हटले आहे.
अधिक माहितीकरिता व नावे नोंदणीकरिता merakitheatre.org या संकेतस्‍थळाला भेट द्यावी किंवा 8600044432 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.