मुंबईः समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार (Traffic Management System on Samruddhi Highway) असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महामार्गावर जिथे वाहनाचा प्रवेश होतो, तेथे गाडीतल प्रवासाची तपासणी केली जाईल. गाडीत जास्त प्रवासी असतील तर अडवले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर शेगावच्या अलीकडे झालेल्या अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात सख्ख्या बहिणी, त्यांची नात, मुलगा, दोन्ही सुना यांचा समावेश होता. या अपघाताचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी महामार्गावरील अपघाताचा मुद्दा गांभीर्याने घेण्याची मागणी केली. नेहमी काही ठिकाणी अपघात का होतात, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.
शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला रविवारी सकाळी मेहकरनजीक शिवणी पिसा गावाजवळ पुलावर अपघात झाला होता. भरधाव कार डांबराच्या पॅचवरून उसळून सुमारे ३०० फूट दूर जाऊन उलटल्याने अपघात झाला. या अपघाताचा मुद्दा आमदार संजय रायमुलकर यांनी उपस्थित केला. आमदार रायमुलकर म्हणाले की, समृद्धी महामार्गावर जात असताना शिवणी गावानजीक पुलावर वाहन स्पीडमध्ये असल्यानंतर ते चालकाच्या लक्षात येत नाही. गाडी पुलावर गेली की वाहनचालकाचे नियंत्रण सुटते. काही अपघातप्रवण स्थळ आहेत. त्यांची चौकशी करून दे दुरुस्त करावे तसेच या अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली होती.