नवी दिल्ली- कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda), त्यांचे पूत्र देवेंद्र दर्डा तसेच जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १३ जुलैला विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते.
राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये चुकीचे तथ्य मांडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडे त्यावेळी कोळसा मंत्रालयाचा कारभार होता. सीबीआयने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाण मिळाली होती. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. आतापर्यंत आरोप सिद्ध झालेलं हे १३ वं प्रकरण आहे. न्यायालयाने जेएलडी यवतमाळला ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने या प्रकरणात २७ मार्च २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोप पत्रात या सगळ्यांनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.