भाजप प्रवेशाच्या चर्चांवर काय म्हणाले अमित देशमुख?

0

लातूरः माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपूत्र व माजी मंत्री अमित देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना अमित देशमुख यांनी शुक्रवारी आपले मौन तोडले. (Congress Leader Amit Deshmukh) “कितीही वादळे आली तरी लातूरचा देशमुख वाडा आहे तिथेच राहणार” असे सूचक विधान अमित देशमुख यांनी केले आहे. आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे अमित देशमुख यांनी यातून स्पष्ट केले आहे. कालपासून अमित देशमुख यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत संकेत दिले होते. मात्र, आता अमित देशमुखांच्या स्पष्टीकरणाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


काल औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गौप्यस्फोट केला होता. लवकरच अनेक बड्या नेत्यांचा भाजपप्रवेश होणार आहे. भाजपमध्ये प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहेत. धक्का बसेल असे प्रवेश होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. (BJP State President Chandrashekhar Bawankule) बावनकुळे यांनी शिवसेनेचे अनेक लोक शिंदेच्या संपर्कात असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतील पक्ष रिकामे होतील. शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. अनेक नेते भाजपामध्ये येणार असून यात अनेक मोठी नावे आहेत. फक्त आता वेळ आणि ठिकाण ठरवायचे राहिले आहे. ती नावे ऐकल्यावर महाराष्ट्राला धक्का बसेल, असेही बावनकुळे म्हणाले होते. मात्र, आता अमित देशमुख यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, भाजप नेते व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशावर गुरुवारी प्रतिक्रिया देताना त्यांच्या संभाव्य प्रवेशाला विरोध दर्शविला होता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा