माहुरझरी अमृत सरोवराजवळ जागतिक योग दिवस साजरा

0

 

नागपूर NAGPUR : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढलेला तणाव घालविण्यासाठी रोज योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त तथा आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी आज व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मीती करण्यात आली. याअंतर्गत माहुरझरी येथील अमृत सरोवरावर योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रंसगी श्री. ठाकरे बोलत होते. मनरेगाचे उपायुक्त अनिल किटे, सहाय्यक संचालक प्रशांत ढाबरे, विस्तार अधिकारी सुनिता भोले, माहुरझरीचे सरपंच प्रमोद राऊत, याप्रसंगी उपस्थित होते.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘वसुधैव कुटूंबकम’ असून राज्याच्या वतीने अमृत सरोवराच्या स्थळी जागतिक योग दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते. माहुरझरी या शिलावर्तुळासाठी प्रसिद्ध ऐतिहासिक गावातील अमृत सरोवराचा परिसर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सुंदर, शांत, निसर्गरम्य व आध्यात्मिक एकरुपतेचे उत्तम प्रतिक असल्याने येथे योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योग दिवस येथे साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ योगदिनानिमित्त योगा न करता योगाभ्यास हा दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सर्वश्री संकेत रामराजे, अशोक लोणारे, नितीन वाकोडे, रविंद्र जामगडे, सहायक गट विकास अधिकारी सिमा गोले, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाचे सभासद तसेच परिसरातील नागरिकांनीही योगाभ्यास सहभाग घेतला.