भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ

0

नागपूर : संविधान दिनाचे औचित्य साधून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ केला.डॉ बाबासाहेब यांच्या जीवनातील नागपूर जिल्ह्यातील चार ठिकाणचे पर्यटन अनुयायांसाठी लवकरच सुरू होणार आहे.


राज्य सरकारच्या पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन नागपूर मार्फत या संदर्भातील एक कार्यक्रम दीक्षाभूमी येथे आयोजित करण्यात आला. राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम चेंबूर येथील फाईन आर्ट सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते. तर दीक्षाभूमीवरून भदंत सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेत आमदार प्रवीण दटके सहभागी झाले होते. याशिवाय व्यासपीठावर सुप्रसिद्ध साहित्यिक कवी ज्ञानेश्वर वाकुडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, प्रदीप आगलावे, एन.आर.सोटे आदींचा सहभाग होता.


नागपूर शहरातील दीक्षाभूमी सोबतच चिंचोली येथील शांतीवन,कामठी येथील ड्रॅगन पॅलेस, तसेच कामठी परिसरातील नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिझम या चार ठिकाणचा पर्यटनासाठी समावेश करण्यात आला आहे. अत्यंत माफक दरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी, अभ्यासकांसाठी व पर्यटकांसाठी ही सुविधा राज्य सरकार मार्फत पर्यटन विभाग उपलब्ध करून देणार आहे.
महाराष्ट्रात आज हा कार्यक्रम नाशिक येथील काळाराम मंदिर, कोकणातील महाड येथील चवदार तळे, पुणे व दीक्षाभूमी नागपूर येथे लाईव्ह करण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणावरून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
‘मी रमाई बोलते’ या नाटिकेचे यावेळी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा भारद्वाज यांनी केले तर आभार पंकज पानतवणे यांनी मानले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा