यवतमाळ: ‘एमडी ड्रग्स’ (मेफेड्रोन) पावडर कारने आणत असताना तिघांना ताब्यात घेऊन 11 लाख 32 हजार 800 रुपयांच्या पावडरसह एकूण 16 लाख 47 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारव्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या मानकोपरा येथे केली. युनूस खान, अमीर खान पोसवाल (वय 36, रा. लोहार लाइन, पांढरकवडा), वसीम उर्फ राजा खान अक्रम खान (वय 34, रा. पठाण चौक, अमरावती), सय्यद इरशाद उर्फ पिंटू सय्यद गौस (वय 35, रा. इकबाल कॉलनी, अमरावती), अशी अटकेतील एमडी ड्रग्स तस्करी करणाऱ्यांची नावे आहेत. या जप्त एमडी ड्रग्सचे वजन 141.6 ग्रॅम असून, बाजार मूल्य 11 लाख 32 हजार 800 रुपये आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केली.