अमरावती -जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पावसामुळे देखील नुकसान झाले. मात्र पीक विमा काढूनही विविध कारणे देऊन अमरावती जिल्ह्यातील 24 हजार शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अपात्र करण्यात आले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. पिक विमा कंपनीला कृषी विभाग पाठिशी घालत असल्याचा आरोप अमित अढाऊ, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यांनी केला. पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे व अपात्र शेतकऱ्यांना पात्र करून शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा, ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. दरम्यान यावेळी गेल्या दोन तासांपासून कृषी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. तर यावेळी पोलिसांचा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.