राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा २८ ला गोंदियात मेळावा

0

गोंदिया : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करताच शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. या दौऱ्याची पहिली सभा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये पार पडल्यावर आता पवारांनी आपला मोर्चा वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळवला आहे. गोंदियात २८ जुलै रोजी शरद पवार गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शरद पवार गटाचे कोणते नेते उपस्थित राहणार आहेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
सध्या गोंदियात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेतृत्व प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल हे करीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया जिल्हाकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते. गोंदियामधून शरद पवार यांना कोण पाठिंबा देणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सुरुवातीला अजित पवार गटाला पाठिंबा देणारे जायस्वाल नंतर पुन्हा एकदा शरद पवार यांच्या तंबूत दाखल झाले आहेत.