सातारा- सातरा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर गावातील एका घरात कुटुंबातील चौघा जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. हे प्रकरण आत्महत्येचे आहे की घातपाताचे, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. मृतांमध्ये आईवडील आणि मुलगा मुलगी अशा चौघांचा समावेश असून त्यांची नावे आनंद जाधव (वय 65 वर्षे) त्यांची पत्नी सुनंदा जाधव (वय 60 वर्षे), मुलगा संतोष आनंद जाधव (वय 35 वर्षे) मुलगी पुष्पलता धस (वय 45 वर्षे) अशी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे एक शेतकरी कुटुंब असून या कुटुंबातील चौघांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले आहेत. रात्री हे कुटुंब एकत्र झोपले होते. सकाळ झाली तरी घरातून कोणीच बाहेर न आल्याने कुजबूज सुरु झाली. घरात त्यांचे फोन वाजत होते. यानंतर ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी एकत्र येऊन घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान हा घातपात आहे की इतर काही याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. या घटनेमागील कारण काय हे अद्याप समोर आले नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या अंगावर कुठल्याही जखमा नसल्याची प्राथमिक माहिती आहे.