३४३ ग्राहकांची ६0 लाखांनी फसवणूक

0
नागपूर
सुफी फंड योजनेत पैसे गुंतविल्यास अधिक व्याजदराने परतावा मिळेल, या आमिषाला अनेक नागरिक बळी पडले. त्यांनी त्यात गुंतवणूकही केली. परंतु, त्यांना कुठलाही परतावा मिळाला नाही. शिवाय, दिलेले पैसेही गमवावे लागले. गुप्ता नावाच्या दाम्पत्यांनी हा प्रताप केला. विशेष म्हणजे या दाम्पत्याने त्याच्या नातेवाईकांनाही सोडले नाही. या दाम्पत्याने ३४२ ग्राहकांनी एकूण ६0 लाख ६७ हजार २00 रुपयांची फ सवणूक केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करीत एका आरोपीला अटक केली आहे. दुसर्‍याचा पोलिस शोध घेत आहेत.
जितेंद्रनाथ ऊर्फ जितू लल्लूराम गुप्ता (वय ४४), अंजना ऊर्फ अंजू जितेद्रनाथ गुप्ता (वय ३८) असे या आरोपी दाम्पत्याचे नाव असून, यातील जितेंद्रनाथ गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २0 नोव्हेबर ते ५ डिसेंबर यादरम्यान, पाचपावली पोलिस ठाणे हद्दीतील प्लॉट नंबर २0१, अशोकनगर, सिद्धी कॉलोनी, राममनोहर लोहिया वाचनालयजवळ राहणारे आरोपी जितेंद्रनाथ ऊर्फ जितू लल्लूराम गुप्ता (वय ४४), अंजना ऊर्फ अंजू जितेंद्रनाथ गुप्ता (वय ३८) यांनी संगनमत करून त्यांचे नातेवाईक असलेले फिर्यादी महेश लोटनप्रसाद गुप्ता (वय ५१, रा. प्लॉट नंबर, १८९ चॉक्स कॉलनी, कामठी रोड) व इतर लोकांना सुफी फंड योजनाबाबत माहिती दिली. या फंडात डेली व इतर गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज दराने परतावा मिळेल, असे आमिष दखविले. आरोपीच्या बोलण्यात आलेल्या फिर्यादी व अन्य लोकांनी या फंडात पैशांची गुंवणूक केली. दरम्यान, डेली कलेक्शनकरिता आरोपींनी पाचपावली पोलिस ठाणे हद्दीतील गोंड मोहल्ला, अशोकनगर, बुद्ध विहाराजवळ ऑफिस उघडले आणि कलेक्शनकरिता काही लोकांची नियुक्तीही केली होती. दरम्यान, आरोपींनी लोकांकडून पैसे घेतले; परंतु त्यांना परत केले नाही. या फंडात फिर्यादी महेश गुप्त यांच्यासह इतर एकूण ३४२ लोकांनी पैसे गुंतविले. या सर्वांची आरोपींनी एकूण ६0 लाख ६७ हजार २00 रुपयांची फसवणूक केली. दरम्यान, गुंतविलेले पैसे मागण्याकरिता सर्वजण केले असता त्यांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली. याप्रकरणी फिर्यादी महेश लोटनप्रसाद गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्जाची चौकशी केल्यानंतर पाचपावली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२0, ४0६, २९४, ५0४, ५0६ (ब), ३४ भादंवि सहकलम ३ म.ठे.अ. अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपी जितेंद्रनाथ गुप्ता याला अटक केली आहे.