५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, संजय राऊतांकडून सीबीआयकडे तक्रार

0

मुंबईः दौंड येथील भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा (Alleged Scam in Bhima Patas Sugar Factory) आरोप करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भीमा पाटस साखर कारखाना हा भाजप आमदार राहुल कुल यांच्या मालकीचा आहे. राऊत यांनी दावा केला की, भाजप आमदार राहुल कुल हे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत. त्यांनीच भीमा पाटस कारखान्यात घोटाळा करून 500 कोटींची मनी लॉन्ड्रिंग केले आहे. या भ्रष्टाचाराचे प्रकरण मी दोन महिन्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सोपवले आहे. मात्र, दोन महिन्यांपासून ते मला भेटीसाठी वेळ देत नाही. त्यामुळे राहुल कुल यांच्या कारखान्याची मी आता सीबीआयकडे तक्रार केली आहे. सीबीआयने मला पोचपावतीही दिली आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे लॉन्ड्रिंग झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा करून संजय राऊत म्हणाले की, हे सर्व पुरावे आता सीबीआयकडे दिले असून सीबीआय या प्रकरणात काय कारवाई करते हे पाहू. विरोधी पक्षातील लोकांना अगदी 2 ते 5 लाख रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. पुरावे देऊनही फडणवीसांनी राहुल कुल यांच्याविरोधात काहीही कारवाई केली नाही. त्यावरून गृहमंत्री फडणवीस हे केवळ विरोधकांवरच कारवाई करतात. मात्र, स्वपक्षातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना, चोर, लुटारूंचे फडणवीस संरक्षण करतात. फडणवीसांना आवाहन आहे की, त्यांनी दरोडेखोरांना पोटाशी घालू नये. महाराष्ट्रात हे फार काळ चालणार नाही. दौंड येथील शेतकऱ्यांनीच भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात उद्या आपली सभा ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.