प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्याहस्ते सन्मान
नागपूर दि. २५ एप्रिल २०२३: महावितरणच्या नागपूर परिमंडल व शहर परिमंडल यांनी मागील वर्षी कार्यक्षमतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. त्यानिमित्त मुख्य अभियंता दिलीप दोडके,अधीक्षक अभियंता अमित परांजपे व त्यांच्या सहकाऱ्यांचा नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नागपूर प्रादेशिक विभागातील सर्व मुख्य अभियंते,अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक सोमवारी २४ एप्रिल ला नागपूर प्रादेशिक संचालक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत वर्ष २०२२-२३ या दरम्यान ग्राहक सेवा,थकबाकी वसुली,नवीन वीज जोडणी देणे इत्यादी महत्वाच्या परिमाणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या परिमंडल,मंडल व विभाग कार्यालयांच्या प्रमुखांचा प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात नागपूर परिमंडल व नागपूर शहर मंडल कार्यालयाने सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली यानिमित्त परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके तसेच नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे व त्यांचे सहकारी कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे,समीर टेकाडे,राहुल जिवतोडे, प्रफुल्ल लांडे, हेमराज ढोके यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय अमरावती शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व भंडारा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांचाही सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान करण्यात आला.
विभागस्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे ,अकोट विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल उईके ,भंडारा विभागाचे कार्यकारी अभियंता नीरज वैरागडे,अमरावती ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर ,बल्लारशाह विभागाच्या कार्यकारी अभियंता इशा गेडाम यांचाही यावेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि दिलेल्या वीज बिलाची १०० टक्के वसुली हे महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रथम कर्तव्य असून मागील वर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांनी याही वर्षी अशीच कामगिरी करावी व इतरांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वोत्तम कामगिरी बजवावी असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी आढावा बैठकीत दिले.