
हरित ऊर्जेच्या दिशेने महापारेषणचे महत्त्वपूर्ण पाऊल
नागपूर(Nagpur), दि. 24 मार्च 2026: शाश्वत ऊर्जा विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने महापारेषणने एक मोठे पाऊल उचलले आहे. नागपूर येथील राज्य भार प्रेषण केंद्र (SLDC), अंबाझरी येथे 60 किलोवॅट क्षमतेच्या अत्याधुनिक रूफटॉप सोलर यंत्रणेचे दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे भार प्रेषण केंद्राच्या वीज वापरामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा वाढणार असून, कार्बन उत्सर्जनात मोठी घट होण्यास मदत होणार आहे.
या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते आणि महापारेषण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश अणे, महावितरण नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या शुभहस्ते या सौर प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाऊर्जा नागपूरचे विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन आणि राज्य भार प्रेषण केंद्राचे मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना शशांक जेवळीकर म्हणाले की, “वाढती ऊर्जेची मागणी आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता अक्षय ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे. सौर प्रकल्पांच्या वाढत्या विस्तारामुळे ग्रीड व्यवस्थापनात नवीन तांत्रिक आव्हाने उभी राहत आहेत. त्यामुळे ऊर्जा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करणे आणि आधुनिक प्रणालींचा अवलंब करणे आवश्यक आहे.”
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी यावेळी नमूद केले की, सौर ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन आणि पारेषण करण्यासाठी राज्यातील वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम आणि लवचिक करणे गरजेचे आहे. महावितरण या बदलांसाठी पूर्णपणे सज्ज असून, ग्राहकांना अखंडित आणि स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना सांगितले की, अंबाझरी केंद्राचा हा पुढाकार हरित ऊर्जेच्या जागतिक मोहिमेला बळ देणारा ठरेल.
महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक सारंग महाजन यांनी महाराष्ट्र सरकारच्या सौर ऊर्जा धोरणावर प्रकाश टाकला. राज्याची सौर ऊर्जेची निर्धारित उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा स्वावलंबित्व मिळवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी अंबाझरी भार प्रेषण केंद्राच्या अधीक्षक अभियंता वैशाली पाझारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता निरंजन दलाल, किशोर जोधे आणि अक्षय बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विभागातील सर्व वरिष्ठ अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 60 किलोवॅटच्या या प्रकल्पामुळे आता अंबाझरी कार्यालय सौर ऊर्जेचा वापर करणार असल्याने वीज बिलातही मोठी बचत होणार आहे.
राज्य भार प्रेषण केंद्र, अंबाझरी येथील रूफटॉप सोलर यंत्रणेचे उद्घाटन प्रसंगी कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता सतीश अणे, मुख्य अभियंता दिलीप दोडके सोबत इतर मान्यवर

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर.
















