नागपुरातील निखिल मेश्राम हत्या प्रकरणी ७ आरोपींना जन्मठेप, ५ निर्दोष

0

 

नागपूर: उपराजधानी नागपुरातील २०१८ च्या निखील मेश्राम हत्याकांड प्रकरणी (Nikhil Meshram Murder Case) सत्र न्यायालयाने ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. शांतीनगर पोलिस हद्दीत कावरापेठ परिसरात प्रेमप्रकरणातून ही घटना घडली होती. या सात आरोपींवर मुलीच्या प्रियकराचा भाऊ निखिल मेश्राम याची हत्या केल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. जन्मठेप ठोठावण्यात आलेल्या आरोपींमध्ये रामसुमेरबाबानगर येथील रहिवासी शंकर नथ्युलाल सोलंकी (वय ४२), देवीलाल ऊर्फ देवा नथ्युलाल सोलंकी (वय २८), सुरज चेतन राठोड (वय २०), रमेश नथ्युलाल सोलंकी (वय ३६), यश ऊर्फ गुड्डू हरीश लाखानी (वय १९), मिख्खन नथ्युलाल सालाद (वय १९), मीना नथ्युलाल सालाद (वय ३५) याचा समावेश आहे.

कशी घडली घटना ?

शांतीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण ऊर्फ विक्की मेश्राम यांचे आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. घटनेच्या आदल्या दिवशी किरण मेश्राम व त्याच्या आईला आरोपींनी मारहाण केल्यावर तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी त्याच्यावर दबाव टाकला. मात्र, किरण व निखिल या दोघांनी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने २० मे २०१८ रोजी आरोपींनी किरण व निखिलच्या डोळ्यात तिखट फेकून त्यांच्यावर लाठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या निखिलचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. तर इतर पाच आरोपी जखमी झाले होते. तक्रारदाराने २४ आरोपींविरुद्ध शांतीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. अतिरिक्त सत्र न्यायालयाने या प्रकरणात १७ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यानुसार, ७ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पाच आरोपींची मुक्तता केली. २४ आरोपींमध्ये ८ विधीसंघर्ष बालकांचा समावेश होता. यातील १२ आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. गीता राठोड, माया सोलंकी, राजुरी परमार, धनश्री सोलंकी या चार आरोपी महिला साडेचार वर्षांपासून फरार आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा