८३ च्या विश्वविजेत्या संघाचा आंदोलनावरील कुस्तीपटूंना पाठिंबा

0

नवी दिल्ली : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनावर असलेल्या कुस्तीपटूंना आज १९८३ च्या विश्वविजेत्या क्रिकेट संघाचाही पाठिंबा (1983 Cricket champion team backs protesting wrestlers) मिळाला. कुस्तीपटूंसाठी आवाज उठवणाऱ्या या क्रिकेटपटूंमध्ये सुनील गावस्कर, मदन लाल, कपिल देव, दिलीप वेंगसरकर आदींचा समावेश आहे. पदकविजेत्या कुस्तीपटूंसोबत पोलिसांनी ज्या पद्धतीनं गैरवर्तन करण्यात आले,ते अस्वस्थ करणारे आहे. अत्यंत कष्टाने जिंकलेली पदके गंगेत सोडण्याच्या निर्णयाप्रत त्यांना यावे लागणे हे वेदनादायी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी कुस्तीपटूंसोबत झालेल्या वर्तवणुकीचा त्या क्रिकेट संघाने निषेध नोंदविला आहे. आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंसोबत घडलेल्या प्रकारामुळे आम्ही सर्वजण व्यथित झालो आहोत, अशी भावना माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे.
कुस्तीपटूंनी त्यांच्या मेहनतीने मिळवलेली पदके गंगा नदीत विसर्जित करण्याच्या निर्णयामुळे आम्ही जास्त चिंतेत आहोत. त्या पदकांमध्ये त्यांची वर्षांनुवर्षांची मेहनत, त्याग, दृढनिश्चय आणि जिद्द आहे. ती पदके केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान आणि आनंद आहे. त्यामुळे घाईमध्ये कोणताही निर्णय न घेण्याचे आवाहन आम्ही त्यांना करत आहोत. त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यांचे त्वरित निवारण देखील करण्यात येईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेला त्यांचे काम करु द्या, असे आवाहन देखील या क्रिकेटपटूंनी केले आहे.