
मुंबई : महाविकास आघाडीत जागावाटप ठरण्यापूर्वी काँग्रेस सर्वप्रथम राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी दोन दिवसांची आढावा बैठक होत असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच. पण, आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चेअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठीच काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसची आढावा बैठक शुक्रवारपासून सुरु झाली आहे. त्याबद्धल बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, बैठकीतून प्रत्येक मतदारसंघातील नेते व पदाधिकारी यांचे मत काय आहे, त्यांच्या भागात कोणते मुद्दे महत्वाचे आहेत याची साधक बाधक चर्चा होणार आहे. या बैठकांनंतर जिल्हा जिल्हा पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील. २०१९ ची परिस्थिती व आत्ताची परिस्थिती यात फरक आहे. एखाद्या निवडणुकीत जागा कमी जिंकल्या म्हणजे तिच परिस्थिती कायम रहात नसते. परिस्थिती बदलत असते. सर्व बाजूंचा विचार करुन निर्णय घेतला जाईल. तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपाचा पराभव करणे कठीण नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. आम्ही एकत्र राहून भाजपाला पराभूत करू, असे चव्हाण म्हणाले.