अ.भा. साहित्य परिषदेची नवी कार्यकारिणी घोषित

0

 

अध्यक्षपदी प्रविण दवणे तर डॉ नरेंद्र पाठक कार्याध्यक्ष

विदर्भातून अविनाश पाठक आणि ऍड सचिन नारळे यांचा समावेश

नागपूर: ८ मे.अखिल भारतीय साहित्य परिषद या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या बहुभाषिक साहित्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाची वर्ष २०२३-२४ ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली असून ज्येष्ठ साहित्यिक प्रविण दवणे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून ठाण्याचे डॉ नरेंद्र पाठक यांची तर महामंत्री म्हणून डॉ बळीराम गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आली आहे..

या कार्यकारिणीत विदर्भातून ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक आणि ऍड सचिन नारळे यांना संधी मिळाली आहे. अविनाश पाठक यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असून सचिन नारळे हे विदर्भ प्रांत प्रतिनिधी म्हणून निवडले गेले आहेत.उपाध्यक्ष म्हणून पाठक यांच्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक
विसुभाऊ बापट यांचीही निवड करण्यात आली आहे..

कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी असे आहेत.

कार्यवाह : श्री.मोहनराव ढवळीकर.
संघटन मंत्री: श्री.नितीन केळकर.
प्रांत प्रतिनिधी :-
कोकण प्रांत:श्री.प्रविण देशमुख.
पश्चिम महाराष्ट्र प्रांत: श्री.शशिकांत घासकडवी.
देवगिरी प्रांत: प्रा.डॉ. पुरुषोत्तम पाटील.
विदर्भ प्रांत: श्री.सचिन नारळे.
समाज माध्यम प्रमुख:
सौ.निकिता भागवत.
संरक्षक: श्री.सुनील वारे.
निमंत्रित सदस्य: श्री.प्रमोद बापट.

रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड येथे झालेल्या साहित्य परिषदेच्या बैठकीत ही कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षाचा आहे..

विदर्भातून या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून निवडले गेलेले अविनाश पाठक हे गत ५० वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असून मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमे आणि समाज माध्यमे यात त्यांचा लिलया संचार राहिला आहे. रामटेकच्या गडावरून या दिवाळी अंकाचे त्यांनी १० वर्ष संपादन केले असून या अंकाला विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची आतापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित झाली असून अजून ३ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. पत्रकारितेतील विविध प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष म्हणूनही ते सध्या कार्यरत आहेत..

विदर्भ प्रांत प्रतिनिधी म्हणून निवडले गेलेले ऍड सचिन नारळे हे व्यवसायाने विधीज्ञ असून वैदर्भीय साहित्यविश्र्वात ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात, विशेषतः तरुणाई करिता त्यांनी विपुल स्तंभ लेखन केले आहे.
“अथांग” या नावाने त्यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत. सध्या साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत महामंत्री म्हणून ते कार्यरत आहेत..

या कार्यकारिणीत सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.