वाघबोडी तलावाजवळील जंगलात बिबट्या आढळला मृतावस्थेत

0

 

भंडारा- भंडारा वनपरिक्षेत्रातील वाघबोडी तलावाजवळ जंगलात बिबट मृतावस्थेत आढळून आला असून वाघ आणि बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भंडारा वन परिक्षेत्र अंतर्गत मालिपार बीटामधील वाघबोडी तलाव जवळील संरक्षित वनात कक्ष क्रमांक २१४ मध्ये वन कर्मचाऱ्यांना एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. वरिष्ठांनी सूचना दिल्यावर भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक चौकशी केली असता बिबट्याच्या मानेवर दोन सुळ्यांचे निशाण दिसून आले. यावरून दोघांच्या झुंजीत ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. भंडारा वन परिक्षेत्रात रावणवाडी, धारगाव, दवडीपार व इतर ठिकाणी वाघांचा सतत वावर वाढला आहे. अनेकदा कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ दिसला आहे. या परिसरात बिबट्यांचाही वावर आहे. यातूनच बिबट्याची येथील निवासी वाघाशी झुंज होऊन त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.