मुंबई : महाविकास आघाडीत आता नवा वाद उफाळून आला आहे. या वादाची ठिणगी अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर पडली आहे.
“जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि आमच्या ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे” या अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतच अंतर्गत वाद सुरू झाला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ते म्हणाले,
सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची परंपरा आहे. कोणी गर्व करावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, इतकीच मोघम प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात, असे खासदार संजय राऊत म्हणाले.