बैठकीला गैरहजर राहणाऱ्यांना पदे नाही

0

आ विकास ठाकरे नागपूर: कॉंग्रेसने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत गैरहजर पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेण्यात येतील, असा इशारा आमदार ठाकरे यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानात जे सहभागी होणार नाही त्यांना पद सोडावे लागेल, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला आहे. अभियान राबविताना कुणी गटबाजीचा विचार मनात आणू नये. आता बूथ पातळीपर्यंत जाऊन काम करण्याची वेळ आलेली आहे. ब्लॉक अध्यक्षांच्या कामाचा नियमित आढावा घेण्यात येईल, जे अध्यक्ष काम प्रामाणिकपणे करणार नाही, त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्यात येतील, असेही शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेच्या यशानंतर काँग्रेस कमिटीने राष्ट्रीय पातळीवर ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्याचा ठराव केला. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक नागपुरात घेण्यात आली. या अभियानाचे नियोजन करण्यासाठी विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर काँग्रेसची बैठक घेण्यात आली. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रधान महासचिव डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, पुरुषोत्तम हजारे आदी अनेक पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.