नागपूर (nagpur) : कानात हेडफोन लावून भटकणे किती जीवघेणे ठरू शकते, याची प्रचितीच काल बुधवारी नागपुरात आली. हेडफोन लावून फिरणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीचा रेल्वेगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची (Engineering Student run over by train in Dongargaon Railway Crossing) घटना बुधवारी सकाळी डोंगरगाव येथील रेल्वे क्रॉसींगवर घडली. मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव आरती मदन गुरव (वय 19 वर्षे) असे होते. ती भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून शिक्षणासाठी ती हिंगणा (higna) तालुक्यातील टाकळघाट येथे तिच्या नातेवाईकाकडे मुक्कामाला होती व डोंगरगावजवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती बुधवारी सकाळी एसटी बसने टाकळघाटवरुन गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ आली होती. त्यानंतर ती रेल्वे फाटकाच्या मार्गाने पायीच रेल्वे स्थानकाकडे निघाली होती. तिने कानाला हेडफोन लावला होता व ती फोनवर कोणाशी तरी बोलत असावी, असा प्रत्यक्षदर्शींचा कयास आहे. हेडफोन लावलेल्या अवस्थेत बोलण्यात तल्लीन झालेली आरती रेल्वेमार्ग ओलांडत असताना बाजुने रेल्वेगाडी येत असल्याचे भानही तिला राहिले नाही. हा प्रकार काही लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड करून तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. पण, ती बोलण्यात इतकी तल्लीन होती की वेगाने येणाऱ्या रेल्वेगाडीने तिला चिरडले. काही क्षणातच ती पुणे-नागपूर रेल्वेगाडीखाली आली व घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. धडक बसल्यावर रेल्वेगाडीने तिला किमान पन्नास ते साठ फूट फरफटत नेले. अनेक लोकांच्या समक्ष हा प्रकार घडला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. लोकांनी हिंगणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अलिकडेच पतंगाच्या मागे धावत असलेल्या एका मुलाचा रेल्वेची धडक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना नागपूर शहरात घडली आहे.