काँग्रेसचा गोंधळात गोंधळ!

0

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या (Graduate and Teacher Constituency of Legislative Council ) निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नाशिकमध्ये काँग्रेसने देऊ केलेली उमेदवारी डॉ. सुधीर तांबे यांनी नाकारली. त्यांच्या ऐवजी पुत्र सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी आपण काँग्रेसचेच उमेदवार असल्याचे ते सांगत होते. पण, महाविकास आघाडीने ते मान्य केले नाही. शिवसेना शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, ( Congress and NCP ) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याबाबत निर्णय प्रतीक्षेत आहे. आता सत्यजित तांबे यांनीही काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. पण, गोंधळ थांबताना मात्र दिसत नाही. गोंधळाचे हे चित्र काही नाशिकपुरतेच मर्यादित नाही.

नागपूर ( nagpur ) शिक्षक मतदारसंघातील अवस्थाही तशीच आहे. प्रारंभी नागपूरची जागा महाविकास आघाडीने शिवसेनेसाठी सोडली होती. शिवसेनेने गंगाधर नाकाडे यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. नाशिकच्या बदल्यात शिवसेनेने नागपूरची जागा काँग्रेसला दिल्याचे सांगितले. नागपूरचा विचार केल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे असे दोन पर्याय उपलब्ध आहे. या दोन्ही संघटना महाविकास आघाडीच्या बाजुच्या आहेत. पण, पाठिंबा द्यायचा कुणाला यावरूनही काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. अडबाले यांना समर्थन द्यावे, अशी विनंती स्थानिक नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली. त्यांची संमती गृहीत धरून माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, बबनराव तायवाडे, रवींद्र दरेकर, किशोर गजभिये यांनी मंगळवारी एक बैठक घेतली. त्यानंर सुनील केदार यांनी अडबाले यांना पाठिंबा जाहीरही करून टाकला.

विशेष म्हणजे मंगळवारी वडेट्टीवार यांच्या घरी झालेल्या बैठकीचे राष्ट्रवादीचे आमदार किंवा पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच नव्हते. म्हणजेच हा निर्णय एकतर्फी ठरतो. काँग्रेस नेत्यांनी अडबालेंना पाठिंब्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्यावरूनही संभ्रम आणि मतभेद आहेत. बुधवारी काँग्रेस नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांनी राजेंद्र झाडे यांना पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यानी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राजेंद्र झाडे यांना पाठिंबा देण्याचा शब्द दिला होती. आता तो पाळला जात नसल्याचे देशमुख म्हणाले. हा गोंधळ ऐवढ्यावरच थांबत नाही तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अद्याप काँग्रेस पक्षाचा अधिकृत निर्णयच झाला नसल्याचे सांगत या गोंधळात अधिक भर घातली. या गोंधळात गोंधळामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढते आहे.

एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो दोऱ्यावर आहेत. त्यांना जनतेचे समर्थनही मिळत आहे. विदर्भ दौऱ्यातही यात्रेवेळी गर्दी उसळली होती. पण, राहुल गांधींची पाठ फिरताच लोकांमध्ये निर्माण झालेली भावना कायम राखण्यात स्थानिक नेते उपयशी ठरले. पूर्वी लोक काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी जिवाचे रान करायचे. आता मात्र काँग्रेसची मिळालेली उमेदवारी नाकारण्याचा क्रम सुरू झाला आहे. काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते बदलणाऱ्या परिस्थिमुळे चिंतेत आहेत. पण, नेते मात्र आपापल्या राजकारणात मश्गूल असल्याने गोंधळ अजूनच वाढत आहे…