Home Artical Blog जेसीबीवरून महसूल अधिकाऱ्याला फरफटत नेणाऱ्या आरोपीला अटक

जेसीबीवरून महसूल अधिकाऱ्याला फरफटत नेणाऱ्या आरोपीला अटक

0

अवैध उत्खनन प्रकरणात प्रशासनाचा कडक पवित्रा

नागपूर(Nagpur): नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या जेसीबी चालक-मालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोरी (नाईक) येथे ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपी आयुर थोटे याच्याविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ मेच्या रात्री परिसरात अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. त्यांनी जेसीबी थांबवण्याचा प्रयत्न करत वाहनावर चढताच चालक आयुर थोटे याने जेसीबी वेगाने पळवली. या प्रकारात निकाळजे यांना तब्बल तीन किलोमीटरपर्यंत जीव धोक्यात घालून फरफटत नेण्यात आले.

घटनेनंतर महसूल विभागाने याची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नायब तहसीलदारांनी दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले आहे. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध उत्खननाविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड उपस्थित होते.

दरम्यान, वेलतूर पोलिसांनी ६ मे रोजी आरोपी आयुर थोटे याला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने अवैध उत्खनन माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.