Home Artical Blog नागपुरात पोलिसांची धडक कारवाई; मुलांना पुढे करून भीक मागणाऱ्यांवर कारवाई

नागपुरात पोलिसांची धडक कारवाई; मुलांना पुढे करून भीक मागणाऱ्यांवर कारवाई

0

नागपूर(Nagpur):  नागपूर शहरात लहान मुलांना पुढे करून भीक मागण्याच्या प्रकारांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत २८ जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर संबंधितांना त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये २२ लहान मुले, ५ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे.

पोलिसांनी शहरातील विविध चौक, सिग्नल आणि गर्दीच्या भागांमध्ये विशेष मोहीम राबवून ही कारवाई केली. तपासादरम्यान या भिक्षेकऱ्यांकडून तब्बल ३० ते ३५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. कडक उन्हात दिवसभर भीक मागून ही रक्कम जमा केल्याची माहिती समोर आली आहे.

यापुढे नागपूर शहरात भीक मागणार नसल्याचे लेखी हमीपत्र पोलिसांनी संबंधितांकडून घेतले आहे. विशेष म्हणजे, लहान मुलांचा वापर करून नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याने, यामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

नागपूर पोलिसांनी शहरातील भिक्षावृत्ती रोखण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली असून, आतापर्यंत ४७२ पेक्षा जास्त भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.