मुंबई-संभाजी भिडे यांचे कार्य चांगले असले तरी त्यांना महापुरुषांवर वाईट बोलण्याचा अधिकार कुणीही दिला नाही, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त लिहिणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी या मुखपत्रावरही कारवाई करण्याचा इशारा दिला.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. भिडेंवर कारवाई करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची ग्वाही दिली. संभाजी भिडे यांचे कार्य चांगले आहे. पण त्यांना महापुरुषांवर वाईट बोलण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या निवेदनात सांगितले की, अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पुस्तक वाचून दाखवायला लावले. त्यातील आशयावर त्यांनी वक्तव्य केले आहे. ज्यात एस.के. नारायणचार्य आणि घोष यांनी लिहलेले पुस्तक असून ते स्वत: ला काँग्रेसचे नेते म्हणून घेत आहे. त्यांची पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे गुरूजी यांनी सहकाऱ्यामार्फत उधृत केला, असे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणी अमरावती पोलिस ठाण्यात संभाजी भिडे गुरूजी यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे गुरूजी हे हिंदुत्वाकरता काम करतात. त्याचे कार्य चांगले असले तरी महापुरुषांवर असे बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. वीर सावरकर यांच्यावर अक्षेपार्ह लिखान सुरू आहे. काँग्रेसचे मुख्यपत्र असलेल्या वृत्तपत्रात शिदोरी नावाच्या सदरात वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैगिंक होते असे लिखान केले जाते. ज्या प्रमाणे संभाजी भिडे गुरूजी यांच्या वक्तव्याचे येथे कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्याऱ्या शिदोरीवरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.