नुसते पुतळे नको छत्रपतींचे चारित्र्य अंगिकारा- नितीन गडकरी

0

नागपुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

नागपूर, 18 जून  : छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, पिता व शासक होते. रामराज्या इतकीच शिवशाही प्रचलित आहे. पुतळा उभा केल्या नंतर त्यांचे विचार आणि कार्याच्या अनुरूप आपले चरित्र, चारित्र्य आणि व्यवहार हवा. तो तसा नसेल तर नुसते पुतळे उभारून काही उपयोग होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणीचे भूमिपूजन रविवारी विद्यापीठ परिसरात गडकरींच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला श्रीमंत मुधोजी राजे भोसले, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, तंजावरचे प्रिंस शिवाजी राजे भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गडकरी म्हणाले की, नागपूर विद्यापीठात ऑडिटोरियम आणि कन्व्हेंशन सेंटर बांधायचे ठरवले आहे. ऑॅडिटोरियममध्ये लाईट अॅण्ड साऊण्ड शो करता येईल का याचे प्रयत्न करू. महापुरूषांचा इतिहास आणि चरित्र नव्या पिढीसमोर नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून नेले पाहिजे. ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांची तुकडोजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढायची ईच्छा अपूर्ण राहिली. लोकसहभागातून पुतळा उभारणे ही खूपच चांगली गोष्ट आहे.

सरकारकडे पैसे मागितले नाही हे चांगले झाले. कारण फुकटात दिलेल्या गोष्टीची लोकांना किंमत राहात नाही. प्रत्येक गोष्टीची थोडी ना थोडी किंमत पडली पाहिजे. सामान्य माणसाचे 11 ते 51 रूपये मिळाले तरी चालेल असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी नितीन गडकरी यांनी वैयक्तिक 5 लाखांची देणगी जाहीर केली. यावेळी बोलताना तंजावरचे प्रिंस शिवाजी राजे भोसले यांनी तंजावरला मोडी लिपीत 15 लाख कागदावर दैनंदिनी लिहून ठेवली आहे. त्याचा अभ्यास प्रकाशित केला तर मराठ्यांचा अप्रकाशित इतिहास उजेडात येईल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.