-विविध विकासकामांचा शुभारंभ
नागपूर NAGPUR – पायाभूत सुविधांसोबतच अत्याधुनिक आरोग्य, शैक्षणिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे नागपूर हे वेगाने विकसित होत आहे. मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई Mumbai, Bangalore and Chennai ही वैश्विक शहरे आहेत पण ती परवडणारी नाहीत. ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर असलेले वैश्विक शहर म्हणून नागपूर जागतिक पटलावर येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शहरातील विविध विकास कामांसोबतच कमाल चौक परिसरात अत्याधुनिक अग्निशमन केंद्र व निवासी संकुल, पोलिस लाईन टाकळी तलाव पुनरूज्जीवन तसेच फ्रेन्ड्स कॉलनी शिवाजी चौक ते हजारीपहाड बस स्टॉप रस्त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित नागपूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन समारंभास आमदार सर्वश्री प्रवीण दटके, विकास ठाकरे, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, माजी महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी, मायाताई इवनाते, माजी आमदार डॅा. मिलिंद माने आदी उपस्थित होते.
नागपूर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे झाले पाहिजेत या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला. पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये नागपूर शहरातील सगळे प्रमुख रस्ते हे काँक्रीटचे करण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डेमुक्त शहर होणार आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिल्यामुळेच नागरिकांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होत आहे. त्यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अमृत दोनची योजना कार्यान्वित होत आहे. या योजनेमुळे पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स , पिण्याच्या पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. देशातला सर्वात यशस्वी चोवीस तास पाणी हा उपक्रम देशात पहिल्यांदा सुरू करण्यात आला असून त्यामुळे आज शहराच्या बहुतांश भागात 24 तास किंवा बारा तास हे पाणी मिळत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर नागपूरच्या सर्व भागात पाणी मिळेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पोलीस लाईन टाकळीच्या तलावाचे सौंदर्यीकरण तसेच शहरातील अकरा तलावांची कामे मंजूर केली आहे. केंद्र पुरस्कृत अमृत योजनेच्या अंतर्गत 11 तलावांचा समावेश करून त्याला निधी उपलब्ध दिला आहे. अकराही तलावांची कामे सुरू झालेली आहेत. येत्या काळामध्ये नागपूर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाईल. नाईक तलाव, सोनेगाव तलाव गांधी सागर तलाव , पोलिस लाईन टाकळीचा तलाव अशा सर्व तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनापासून ते छटपूजेकरिता देखील सुविधा उपलब्ध होईल.
मेयो आणि मेडिकल या दोन मेडिकल कॉलेजमध्ये सुविधांसाठी 800 कोटी रुपये दिले आहेत. अतिशय अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. त्यासोबतच मानकापूर स्टेडियम जागतिक दर्जाचे करण्याकरिता 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहरातील विविध मोहल्यांमध्ये 60 स्टेडियम आपण तयार करण्यासाठी दीडशे कोटीचा आराखडा तयार केला आहे.
नागपूर शहरामध्ये दळणवळणाच्या सुविधांसाठी इलेक्ट्रिक बसेस देण्यात आल्या असून यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम तयार करण्यात येऊन पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पश्चिम नागपुरात वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून विकास करण्यात येईल. विकासकामे करताना पक्ष, जात, धर्म, पंथ असा कुठलाही भेदाभेद नसतो. शहरातील जनतेचे कल्याण हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यापुढे असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी पोलीस लाईन टाकळीपासून काटोल नाक्याच्या पुढे एक उड्डाणपूल होणार असून त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शहरातील सांडपाण्याची पाईपलाईन अद्ययावत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कन्सल्टन्सीचे सहकार्य घेण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.