Home Artical Blog महावितरण नागपूर परिमंडळात अनुकंपा नियुक्ती व अंतिम देयकांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

महावितरण नागपूर परिमंडळात अनुकंपा नियुक्ती व अंतिम देयकांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

0

नागपूर (Nagpur), दि. 23 एप्रिल 2026: मृत्यू अथवा वैद्यकीय कारणास्तव मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती तसेच अनुषंगिक अंतिम देयकांबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने महावितरण, नागपूर परिमंडळात विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले.

नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या शिबिरात सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक सुशिल विखार, उप व्यवस्थापक अमित पेढेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या शिबिरात उपस्थित वारसांच्या विविध अडचणी, प्रश्न, तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भातील अडथळे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अनुकंपा नियुक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, अर्ज सादरीकरणाची पद्धत, प्रक्रियेतील टप्पे, तसेच अंतिम देयकांमध्ये समाविष्ट असलेल्या निधीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वारसांना त्यांच्या नोकरीसाठी निश्चित असलेल्या जेष्ठता क्रमांकाबाबत माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांच्या प्रकरणाची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल. तसेच, नोकरीचे प्रकरण तयार करताना सुलभता यावी यासाठी त्यांना माहिती पुस्तिका व आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट देखील पुरविण्यात आली. विशेष म्हणजे उमेदवारांच्या शैक्षणिक अहर्तेबाबत सद्यस्थिती जाणून घेऊन तातडीने नियुक्ती मिळावी यादृष्टीने शैक्षणिक अहर्तेत काही अनुरूप वाढ करता येईल का, याबाबत सुद्धा मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

अनेक वेळा माहितीअभावी किंवा प्रक्रियात्मक त्रुटींमुळे वारसांना वेळेवर लाभ मिळण्यात विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन या शिबिरामध्ये वारसांना योग्य कागदपत्रांची पूर्तता, प्रलंबित प्रकरणांचे निराकरण आणि तांत्रिक व प्रशासकीय बाबी स्पष्ट करून देण्यात आल्या.

या शिबिरादरम्यान वरिष्ठ अधिका-यांनी उपस्थित उमेदवारांच्या समस्या समजून घेत त्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. त्याचप्रमाणे महावितरण ही देशातील अग्रगण्य कंपनी असून तीच्याबाबत आत्मियता ठेवून “आपली कंपनी” म्हणून भविष्यात नौकरी लागल्यानंतर काम करण्याची जिद्द ठेवा, असेही कळकळीचे आवाहन केले.

या शिबिराच्या यश्स्वीतेसाठी मुख्य लिपिक सुधीर येवले, व निम्नस्तर लिपिक कमलेश मांडवगडे, यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरामुळे अनेक वारसांना त्यांच्या प्रकरणांबाबत स्पष्टता मिळाली असून अनुकंपा नियुक्ती व अंतिम देयक प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. महावितरणकडून अशा प्रकारचे मार्गदर्शन उपक्रम पुढेही राबविण्यात येतील, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

फोटो ओळ: अनुकंपा नियुक्ती व अंतिम देयकांबाबत अयोजित शिबिराला मार्गदर्शन करतांना मुख्य अभियंता दिलीप दोडके

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर

 

#Nagpur #Mahavitaran #MSEDCL #AnukampaNiyukti #CompassionateAppointment #GuidanceCamp #EmployeeWelfare #NagpurNews #MaharashtraNews #PublicSector #HRInitiative #GovernmentScheme #Transparency #FinalSettlement #SocialSupport #ShankhnaadNews