Home Top News वीज ग्राहकांनो, तुमची ‘सुरक्षा ठेव’ तुमच्याच फायद्याची! महावितरणचे अतिरिक्त ठेव भरण्याचे आवाहन

वीज ग्राहकांनो, तुमची ‘सुरक्षा ठेव’ तुमच्याच फायद्याची! महावितरणचे अतिरिक्त ठेव भरण्याचे आवाहन

0

नागपूर (Nagpur), दि. 22 एप्रिल 2026: महावितरणच्या नागपूर परिमंडलातील ग्राहकांना एप्रिल आणि मे महिन्याच्या वीज बिलासोबत आता ‘अतिरिक्त सुरक्षा ठेव’ भरण्याचे स्वतंत्र बिल प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत असून, वीज ग्राहकांनी या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सुरक्षा ठेव म्हणजे काय आणि ती का घेतली जाते?
आपण आधी वीज वापरतो आणि त्यानंतर त्याचे बिल भरतो. बिल मिळण्यास आणि ते भरण्यास साधारणतः दीड महिन्याचा कालावधी लागतो. या काळात होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वीज कायदा 2003 नुसार प्रत्येक ग्राहकाकडून दोन महिन्यांच्या सरासरी बिलाइतकी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. ही रक्कम महावितरणकडे ग्राहकाच्या नावे सुरक्षित असते आणि वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद करताना ती व्याजासह परत केली जाते.

दरवर्षी का भरावी लागते अतिरिक्त रक्कम?
विद्युत पुरवठा संहिता-2021 नुसार दरवर्षी या ठेवीची पुनर्गणना केली जाते. जर तुमचा मागील वर्षातील विजेचा वापर वाढला असेल, तर दोन महिन्यांच्या सरासरीनुसार सुरक्षा ठेवीची रक्कमही वाढते. अशा वेळी पूर्वी जमा असलेली रक्कम वजा करून केवळ उर्वरित ‘फरकाची’ रक्कम ‘अतिरिक्त सुरक्षा ठेव’ म्हणून मागितली जाते. विशेष म्हणजे, तुमच्याकडे जमा असलेल्या या ठेवीवर महावितरण दरवर्षी रिझर्व्ह बँकेच्या दराप्रमाणे (मागिल वrSI हा दर 6.75 टक्के होता) व्याज देते, जे तुमच्या वीज बिलात समायोजित केले जाते.

उदाहरणातून समजून घ्या:
समजा तुमची जुनी सुरक्षा ठेव 1,000रुपये जमा आहे. पण गेल्या वर्षी तुमचा वीज वापर वाढल्याने आता नवीन हिशोबानुसार तुमची ठेव 1,200 रुपये होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला केवळ 200 रुपये अतिरिक्त भरावे लागतील.

घरातूनच करा भरणा:
लघुदाब ग्राहकांसाठी ही अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा ‘महावितरण’ मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या या रकमेचा भरणा करू शकतात.

ग्राहकांनी ही सुरक्षा ठेव वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे, कारण ही रक्कम अंतिमतः ग्राहकांच्याच हितासाठी आणि वीज वितरण यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी वापरली जाते, असे प्रतिपादन महावितरणच्या जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर