पुणे : विरोधी पक्षनेते (AJIT PAWAR) अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार (SANJAY RAUT) संजय राऊत यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टिकाटिप्पणी सुरुच असून “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही”, असे प्रत्युत्तर देणाऱ्या राऊतांवर अजित पवार यांनीही पलटवार (Ajit Pawar vs Sanjay Raut) केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांना संजय राऊत यांच्याबद्धल प्रश्न विचारला असता पवारांनी कोण संजय राऊत? असा प्रश्न केला. “प्रत्येक प्रवक्त्याने आपापल्या पक्षावर बोलावे, हे म्हणताना मी कुणाचे नाव घेतले नव्हते, मग कुणाच्या अंगाला का लागावे”, असा प्रश्नही अजित पवारांनी केला.
माझ्याबाबतच्या असणाऱ्या शंका-कुशंका डोक्यातून काढून टाका, असे आवाहनही पवारांनी माध्यमांना केले. मागील तीन दिवसांपासून अजित पवार यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकार लगावली होती. आमच्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत. आमच्या पक्षाचे वकिलपत्र इतर कोणी घेऊ नये, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मी सत्य बोलत राहणार आहे, मी कोणाला घाबरणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले होते.