निवडणूक विभागाचे 15 जुलैला ‘युवा मिशन’,मतदानाची टक्केवारी 75 टक्के करण्याचे उद्दिष्ट

0

नागपूर : ‍स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात युवा मिशन राबविण्यात येत आहे. युवा मिशनचा उद्घाटन सोहळा 15 जुलै रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असून उद्घाटक म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, युवा मिशन सोहळयास जास्तीत जास्त संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनीनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोदणी अधिकारी व सहाय्यक नोंदणी अधिकारी यांची स्विप अभियानाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना या बैठकीला पाचारण करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रविण महिरे यावेळी उपस्थित होते.
युवा मिशन 75 अंतर्गत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 75 टक्के झाली पाहिजे यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आता विविध उपक्रम जिल्हा प्रशासन राबवणार आहे.
स्विप अंतर्गत या कालावधीत 75 उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मिशन युवा एन, मतदार दूत अशा 75 ॲक्टीव्हीटी राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच जिल्ह्यातील युवा संघटना, स्वयंसेवी संस्था, सोशल मिडियाचे प्रतिनिधी, महाविद्यालयांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. विविध स्पर्धाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात मिशन 75 राबवा, असेही त्यांनी सांगितले.