अमरावती- अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीतील रतन इंडिया पावर लिमिटेड या कंपनीत विविध विभागात काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपतींकडे परिवारासह इच्छा मरणाची मागणी केली आहे. रतन इंडिया कंपनीने सण 2021 – 2022 मध्ये कर्मचाऱ्यांना असमान व अन्यायकारक वेतनवाढ दिली होती. त्याविरोधात प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी आवाज उठविला. त्यावेळी कामगार उपायुक्त यांनी मध्यस्थी केल्यानंतर रतन इंडिया कंपनीने 2023 मध्ये वेतनवाढ करू असे लेखी आश्वासन दिले होते. यावर्षी सुद्धा कंपनीने असमान व अन्यायकारक वेतनवाढ केली असल्याने 95 प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी परिवारासह इच्छामरणाच्या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतीकडे केली असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त कामगार प्रफुल्ल तायडे यांनी दिली.