अंबादास दानवे म्हणातात, “तारीख पे तारीखचा खेळ सुरू…”

0

मुंबई – न्यायालयाने सत्तासंघर्षावरील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय आज दिला. सतत अशा पद्धतीने तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (Leader of Opposition Ambadas Danve) दिली. सतत सुरू असलेल्या तारीख पे तारीख यावरुन अनिल कपूरच्या मेरी जंग या चित्रपटाची आठवण झाली. सर्व परिस्थिती समोर आहे. पक्षांतर बंदीचा कायदा आहे. आयोग काय बोलते हे समोर आहे. निदान फेब्रुवारीच्या १४ तारखेला तरी न्यायालय निर्णय देईल, अशी अपेक्षाही दानवे यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात हा विषय सुरू असताना निवडणूक आयोग घाई का करत आहे, असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.
दानवे म्हणाले की, वैधानिक दृष्ट्या हे सरकार वैध्य नाही. पक्षांतर कायदाही तेच सांगतो. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन खुशाल दुसऱ्या पक्षात जावे, असे दानवे म्हणाले. मंत्री मंडळाचा विस्तारही सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेनुसारच सुरू आहे. त्यालाही तारीख पे तारीख मिळत असल्याची मिश्किल टीकाही दानवे यांनी केली. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तोपर्यंत शिवसेनेचे भविष्य उज्वल आहे. आमदार रवी राणा यांनी बच्चू कड्डूंच्या वक्तव्यांकडे पहावे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. तसेच राणा पती पत्नी आमदार व खासदार यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे, असा टोला दानवे यांनी राणा यांना लगावला.
एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधांनाना यावे लागते. यावरून येथील नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठे आहे, हे सिद्ध होते. हा शिवसेनेचा विजय आहे, हे मानावे लागेल, असेही दानवे म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा