नागपुरातील गाजलेल्या एकनाथ निमगडे हत्याकांडातील शूटरला अटक

0

नागपूर: नागपुरातील आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे (वय ७२) यांची सहा वर्षांपूर्वी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील शूटरला अटक करण्यात आता सीबीआयला यश आले (CBI Arrest Shooter in Eknath Nimgade Murder Case) आहे. नरसिंगपूर कारागृहातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव मोहनीश अन्सारी असे असल्याचे सूत्रांनी सांगितले. तो छिंदवाड्याचा रहिवासी आहे. 6 सप्टेंबर 2016 रोजी एकनाथ निमगडे यांच्यावर लाल इमली चौकात गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.
या प्रकरणात पोलिसांनी कुख्यात रणजित सफेलकर, कालू ऊर्फ शरद हाटे, नब्बू ऊर्फ नवाब छोटे साहबसह 13 जणांना अटक केली. चौकशीदरम्यान सफेलकर याने पाच कोटी रुपयांची सुपारी घेऊन निमगडे यांची हत्या केल्याची कबुली दिली होती. वर्धा मार्गावरील सुमारे साडेपाच एकर भूखंडाच्या वादातून निमगडे यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले होते.

या प्रकरणातील शूटर सीबीआयला गवसला नव्हता. त्यामुळे त्याचा कसून शोध घेण्याच्या अनुषंगाने हत्याकांड घडले त्या दिवशीच्या परिसरात लागलेल्या सीसीटीव्हीची कसून तपासणी करण्यात आली होती. त्यातून गोळीबार करणारा मारेकरी हा मोहनीश अन्सारी उर्फ राजा पीओपी असल्याचे निष्पन्न झाले. सीबीआयने राजाचा शोध सुरू केला होता. तो मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील कारागृहात असल्याची माहिती मिळताच सीबीआयने प्रोडक्शन वॉरंटवर त्याला अटक केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा