आंबेडकर आणि काँग्रेस…

0

 

राज्यातील महाविकास आघाडी अधिक मजबूत होऊन निवडणुकात उत्तम परिणाम बघायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्या सोबत असायला हवेत. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते आणि त्याचा परिणाम होऊन काँग्रेसच्या पडलेल्या जागा बघितल्या तर आंबेडकर हा अत्यंत प्रभावी फोर्स आहे याची सत्यता कुणालाही पटेल.
ज्या वेळी आंबेडकरी मतदार काँग्रेस सोबत येतात तेव्हा केवळ बौद्धच येत नाहीत तर त्यांच्या सोबत जुळलेला अठरा पगड जातींचा आणि भटक्या विमुक्तांचा मोठा वर्ग जुळत असतो. देशपातळीवर मोदी,संघ परिवार आणि कट्टर समूहाचे जे काही सुरू आहे,ते विचार करणाऱ्या कुणालाही नव्याने समजून सांगण्याची गरज नाही,सतत दोन टर्म मोदी आणि भाजप विजयी झाल्याने तिसऱ्या वेळीही काहीही करून त्यांना सत्ता हवी आहे, राम मंदिर,370 झाले आहे आता समान नागरी कायदा आला की वचन नाम्यातील जुनी आश्वासने पूर्ण होतात.
आता पुढे काय असा प्रश्न आपल्याला पडला असला तरी भाजपला नाही पडत कारण त्यांची यादी मारुतीच्या शेपटी सारखी वाढत असते.काशी,मथुरा बाकी आहेच,त्यासाठी जमीन तयार केली जात आहे,इतिहास बदलला जातोय,उत्क्रांती त्यांना नकोय,वैज्ञानिक आणि संशोधन क्षेत्रात बजेट कमी केले आहे,परिवारातील भगिनी संघटना ज्या हिंदुराष्ट्राचे स्वप्न बघत आहेत,ते अधिकृत कुणी सत्ताधारी नाकारत नाही.
मनमानी निर्णय घेऊन ते फसले तर त्यावर कुणीही प्रश्न उपस्थित करू नये अशी मोदींनी व्यवस्था निर्माण केली आहे,सगळ्या मंत्री मंडळाने ती मान्य केली आहे,या स्थितीत संविधान वाचेल की नाही ? लोकशाही जिवंत राहणार की नाही ? याबद्दल मोठा वर्ग संशय व्यक्त करीत आहे.अशावेळी यावेळी लोकसभा निवडणुकीत इंडिया जिंकणे काळाची गरज झाली आहे,त्यासाठी सगळ्या फुले, शाहू आंबेडकरी विचारांच्या पक्ष आणि सामाजिक,सांस्कृतिक संघटनांनी महाविकास आघाडी कशी मजबूत होईल यासाठी आतून प्रयत्न केले पाहिजेत.
ऍड.आंबेडकर यांना सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा आहे,राज्यातील अनेक पहिल्या फळीतील नेत्यांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांचा कल दिसतो मात्र त्या सोबत ते काही पण,परंतु मागे ठेवतात,त्यांचा विचार दुसऱ्या बाजूने ऍड.आंबेडकरांनी यावेळी करायला हवा.सध्या आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असली तरी त्यांच्यात अजून तरी फेविकोल जोड तयार झाला नाही. महाविकास आघाडीचा चौथा घटक पक्ष म्हणून त्यांचा समावेश झालेला नाही,तो व्हायला हवा असे वाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मात्र तेवढे पुरेसे नसते,ऍड.आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोवर दिलजमाई होत नाही आणि जागा वाटप सूत्र ठरत नाही तोवर काही खरे नाही.
महाविकास आघाडी एकसंघ राहीली आणि त्यात आंबेडकर सामील झाले तर लोकसभा आणि विधानसभा अश्या दोन्ही मैदानात आघाडी नक्कीच आपला झेंडा रोवेल यात संशय नाही . त्यासाठी आता बाळासाहेब आंबेडकर काळाची गरज ओळखून काही पावले मागे जाण्याची गरज पडली तरी त्यात मागेपुढे बघू नये. जागांची मोठी यादी ते देतात असा कांग्रेसचा आक्षेप असतो त्याचा विचार केल्यास त्यात तथ्य दिसते, लोकसभेचा विचार केल्यास वंचितने चार,पाच जागांवर तडजोड करायला हवी,असे झाले तर वंचितच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळासाहेब केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून दिसतील.
नेता कोणत्याही क्षेत्रातील असला तरी त्याला वयाचे बंधन असते,त्यांना मानणाऱ्या सर्व आघाड्यांवरील लोकांच्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याची किंवा त्या दिशेने जाण्याची सुद्धा एक वेळ असते,मला वाटते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत विचार केल्यास ती योग्य वेळ आता आली आहे. बाळासाहेबांना जे लोक गेल्या काही दशकापासून ओळखतात त्यांना त्यांचा अभ्यास,दूरदृष्टी, वैचारिक क्षमता,सामाजिक भान यांची माहिती आहे ,त्यांना स्वतःच्या काही भूमिका आहेत त्यामुळे त्याबाबत त्यांचे काही टोकाचे आग्रह पण आहेत,त्या सर्वांचा परिणाम राजकीय मैत्री करताना आजवर होत आला आहे हे मान्य करावे लागेल ,राजकीय तडजोड म्हणजे जय,पराजय नसतो,व्यापक देश,समाज हितासाठी काही पावले मागे यावे लागते आणि अनुकूल स्थिती झाल्यावर भात्यातून बाण काढावे लागतात,आता बाळासाहेबांनी त्या मार्गाने गेले पाहिजे असे माझे मत आहे.
लोकसभेत चार,पाच खासदार आणि विधानसभेत आठदहा आमदार असले की अनेक समस्यांची दारे उघडतात.समाजसेवा आणि नाही रे वर्गाच्या प्रगतीचा मार्ग सत्तेतून जात असतो, शासनकर्ती जमात बना हे बाबासाहेब आंबेडकर यांनी उगाच नाही म्हटले,त्यामागे त्यांचे व्यापक चिंतन होते,आता त्याच चिंतनाचा धागा पकडत वंचित बहुजन आघाडीने यावेळी निर्णायक राजकीय प्रयत्न केला पाहिजे.कोणत्याही साधारण मुद्द्याला घेऊन हा प्रयत्न बिघडू नये,असे झाले तर केवळ वंचित समूहाचे किंवा ऍड.आंबेडकर यांचेच नव्हे तर राज्यातील फुले, शाहू आंबेडकरी विचार मानणाऱ्या मोठ्या अराजकीय समूहाचे मोठे नुकसान होणार आहे.