मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता शिंदे गटासह विरोधकांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून जागावाटपाबाबत बोलण्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांना (Political Reactions on BJP Leader Bawankule`s Statement) कोणताही अधिकार नाही, त्यामुळे बावनकुळेंना जेवढे अधिकार आहे, तेवढेच त्यांनी बोलायला हवे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर या निमित्ताने शिंदे गटावर तुटून पडण्याची संधी साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोमणा मारला. शिंदे गटाची लायकीच तेवढी असल्याची टीका राऊतांनी केली.
राज्यात भाजप २४० जागा लढविणार, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले. या वक्तव्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण देत पदाधिकाऱ्यांना तयारी मार्गदर्शन करण्यासाठी तसे बोलल्याचे सांगितले. मात्र, आता त्यांच्या वक्तव्याच्या शिंदे गटासह विरोधकांमध्येही प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, जागा वाटपाचा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते घेतात. अद्याप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी जागा वाटपाचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सांगताना बावनकुळेंनी अधिकारात आहे, तेवढेच बोलावे असे शिरसाट म्हणाले. तर निवडणुकीपर्यंत शिंदे गट टिकेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तर संजय राऊत यांनी शिंदे गटाची लायकीच तेवढी असल्याची टीका केली. शिवसेनेने एका जागेसाठी भाजपसोबत युती तोडली होती. हा शिवसेनेचा स्वाभिमान होता. आता भाजप जे तुकडे फेकेल ते शिंदे गटाला आयुष्यभर चघळावे लागतील. पुढील निवडणुकीत भाजप 40 काय 5 जागाही शिंदे गटाच्या तोंडावर फेकणार नाही, असे राऊत म्हणाले.