मुंबईः शेतकरी व आदिवासींच्या मागण्यासाठी नाशिकहून मुंबईच्या विधानभवनाच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते जे. पी. गावित यांनी ही माहिती दिली (Farmer Long March) आहे. शेतकऱ्यांचा लाँग मार्च सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेते जे. पी. गावित म्हणाले, सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही माहिती देऊन त्याबाबतचे निवेदन पटलावर ठेवले आहे. उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे गावित म्हणाले. काल मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत बोलताना यासंदर्भात घोषणा करून मार्च स्थगित करण्याचे आवाहन केले होते.
किसान सभेच्या वतीने कांदा उत्पादकांना अनुदान द्यावे, जमीन कसणाऱ्या आदिवासींच्या नावावर ती जमीन करावी, कर्ममाफी द्यावी, यासह 14 प्रमुख मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला होता. किसान सभेच्या शिष्टमंडळांसोबत गुरुवारी सायंकाळी विधान भवनात अडीच तास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. या बैठकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन केले. त्यात कांदा अनुदानात ५० रुपयांची वाढ करून आता 350 रुपये करण्यात आली आहे. तसेच वनजमिनींबाबत मंत्री, शासकीय अधिकारी आणि भारतीय किसान सभेच्या नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. दरम्यान, किसानसभेचे नेते जे. पी. गावित म्हणाले, सध्या आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. आमच्या उर्वरित मागण्या विचाराधीन असल्याचे सरकारने सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या निर्णयांची घोषणा केली होती, त्या निर्णयांची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केली आहे. आमच्यापर्यंत आलेले निवेदन समाधानकारक आहे, असे ते म्हणाले.