मुंबईः काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानसभेत उमटले आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सत्तापक्षाच्या सदस्यांनी केली. विधान भवनाच्या आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचे (Congress MP Rahul Gandhi) आंदोलन केले गेल्याने संताप व्यक्त करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलाच समाचार घेतला. “स्वतः क्रांतीवीर भगत सिंग यांनीही सावरकरांनी छापलेले आत्मचरित्र वाटायचे काम केल्याची गोष्ट इतिहासात नमूद आहे. मग सावरकरांचा अपमान करणारे हे कोण आलेत? ते काय भगत सिंग यांच्या पेक्षा मोठे आहेत का?” या शब्दात फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
फडणवीस म्हणाले की, “देशाचे सुपूत्र आणि क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे बोलले जातेय, ते बोलणे बंद केले पाहिजे. सावरकरांनी देशासाठी जे भोगलं ते दुसऱ्या कोणी भोगलेलं नाही. अंदमानच्या कारागृहात त्यांनी अनन्वित अत्याचार सहन केले. ११ वर्ष त्रास सहन केला. अत्याचार होत असताना इतर सहकारी मृत्यूमुखी पडले, अनेकजण अक्षरशः वेडे झाले. त्यामुळे सावरकरांबद्धल कोणी अपशब्द वापरत असेल तर त्या वक्तव्याचा निषेध झालाच पाहिजे.”